मोदी यांना सहा भाऊ आहेत, तर अमित शाहा यांनाही सहा बहिणी…

0
170

काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेससह विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदी हे खोटारडे पंतप्रधान असून उलट देशात मुस्लीम लोकसंख्या घटत असल्याचे ते म्हणाले.

रविवारी हैदराबादमध्ये ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी खोट बोलत असून ते देशात मुस्लीम आणि दलितांविरोधात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. ही मोदी गॅरंटी आहे. पंतप्रधान म्हणतात की देशात मुस्लीम लोक सर्वाधिक मुलं जन्माला घातलात. पण नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ आहेत, तर अमित शाहा यांनाही सहा बहिणी आहेत. तरीही हे लोक मुस्लिमांच्या मुलांबाबत बोलतात, अशी टीका औवेसी यांनी केली.

मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार देशात मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वात कमी आहे. तसेच दिवसेंदिवस मुस्लिमांची लोकसंख्याही घटत आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात, असे मी म्हणत नाही, तर मोदी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र, तरीही मुस्लीम लोक जास्त मुलं जन्माला घालतात, असे मोदी म्हणत आहेत. याचं कारण भाजपा आणि संघाच्या लोकांना हिंदूंच्या मनात भीती निर्माण करायची आहे. एका विशिष्ट काळात देशात मुस्लिमांची संख्या हिंदूपेक्षा जास्त होईल, अशी भीती ते हिंदुंना दाखवतात. मात्र, असं कधीही होणार नाही, असेही ते म्हणाले.

रविवारी राजस्थानच्या बन्सवाडा येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेसला जोरदार टीका केली होती. “आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला होता. तसेच “काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असंही मोदी यावेळी म्हणाले होते.