नवी मुंबई, दि. १२ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित असलेला शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे आज (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनानंतर नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. दरम्यान, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सर्वांत जास्त आनंद आहे की अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. याचे भूमिपूजनही मोदींनी केलं होतं. या देशात मोदीराज आला म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. मोदीराज आला नसता तर अटल सेतू होऊच शकला नाही. अटल सेतूची १९७३ मध्ये संकल्पना मांडली होती. १९८२ मध्ये जेआरडी टाटा कमिटनीने अलाईन्टमेंट केली. परंतु, ४० वर्षांत काहीच झालं नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाचा मिजास बदलला, काम करण्याची पद्धती बदलल्या आणि मग अनेक गोष्टी वेगाने चालू लागल्या.
“मोदींच्या सरकारने सर्व पर्यावरणीय परवानग्या वेळेत पूर्ण करून दिल्या. काही लोक म्हणत होते ही जागा फ्लेमिंगो सँच्युरी आहे. त्यांचं काय होईल? BNHS च्या माध्यमातून मेजर्स केले आणि आज आपण पाहत आहोत की फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे. या प्रकल्पासाठी एवढं मोठं कर्ज जपानचं सरकार देत होतं, राज्याच्या बजेटमध्ये हे घेतलं असतं तर ग्रामीण भागात हा प्रकल्प करायची ताकद कमी झाली असती. पण सगळ्या प्रथा बाजूला करून एमएमआरडीएला कर्ज द्या असं निवेदन आम्ही मोदींना दिलं. केंद्रीय कॅबिनेटमधून एमएमआरडीएला हे कर्ज उपलब्ध करून दिलं. आज हा सेतू पूर्ण होत आहे”, असं फडणवीस म्हणाले.
मुंबईला जोडणारा रिंग रोड लवकरच होणार
“हा सेतू अभियांत्रिकीचा अद्भूत नमूना आहे. या सेतूला आपण कोस्टल रोड, ऑरेंज टनेल, वरळीला जाणारा ब्रिज, कोस्टलवरून वांद्रे, वरळी -वांद्रे सीलिंक, वर्सोवा ते विवार, विवार ते अलिबाग नवा कॉरिडॉर जोडत आहोत. यामुळे, पहिल्यांदा मुंबई आणि उपनगराला रिंग रोड, लूप रोड मिळत आहे. २०१९ मध्ये मोदींनी संकल्पना मांडली होती की मुंबईत कुठूनही ५९ मिनिटांत पोहोचता आलं पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्यापद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असं नेटवर्क तयार होईल”, असं आश्वासनही फडणवीसांनी जनतेला आणि मोदींना दिलं.
गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या २५ वर्षां देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला कोण ताकद देईल तर तो रायगडचा परिसर देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. ६५ टक्के डेटा सेंटर कॅपासिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे. आपण जिथे बसलो आहोत तिथे नवं विमानतळ होणार आहे. त्या विमानतळाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते झालं होतं. या वर्षांच्या अखेरीस विमानतळाचं उद्घाटनही करू हा आमचा विश्वास आहे, असाही शब्द फडणवीसांनी दिला.