नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येत आहेत, मोदी सरकारला रोखण्यासाठी ते रणनीती आखत आहेत. विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. आज (सोमवार) नीतीश कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेणार आहे. हे तीनही नेते लखनौ येथे भेटणार आहेत. भाजपच्या विरोधकांना एकत्र करण्यासाठी ही भेट आहे, असे नीतीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नीतीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांची भेट ही वैयक्तीक आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचे समजते.या मुद्दांवर ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी गेल्या महिन्यात चर्चा केली होती. नीतीश कुमार यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही यावेळी उपस्थित होते. भाजपच्या विरोधात आघाडी करण्यासाठी विरोधकांच्या या हालचाली महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.
नीतीश कुमार पूर्वी राज्य पातळीवरील नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांनी यात बदल करुन राष्ट्रीय पातळीवरील विरोधी नेत्यांची एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या बुधवारी नीतीश कुमार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीष रावत यांची भेट घेतली.