मोदींच्या विधानावर टीका करणाऱ्या भाजपच्या उस्मान गनी यांना अटक

0
207

भारतीय जनता पक्षाचे बिकानेर अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उस्मान गनी यांना पोलिसांनी शनिवारी (27 एप्रिल) सकाळी अटक केली आहे. बिकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलिस स्टेशनचे प्रभारी धीरेंद्र सिंह यांनी फोनवर बीबीसी हिंदीला सांगितलं की, “दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे एक वाहन त्यांच्या घराजवळ गेले होते तेव्हा ते दिल्लीत होते. शनिवारी ते पोलिस ठाण्यात आले आणि बॅरिकेडिंग करणाऱ्या पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर उस्मान गनी यांना सीआरपीसीच्या कलम 151 (शांतता भंग) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.”

मात्र, दोन दिवसांपूर्वी पोलिसांची गाडी उस्मान यांच्या घराजवळ नेमकी कशासाठी गेली होते हे मात्र धीरेंद्र सिंह यांनी सांगितलं नाही. उस्मान गनी हे भाजपचे बिकानेर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष होते.

तीन दिवसांपूर्वी दिल्लीत एका टीव्ही चॅनलशी संवाद साधत त्यांनी नरेंद्र मोदींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. उस्मान गनी यांचे वक्तव्य प्रसारित झाल्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

एका टीव्ही चॅनलशी बोलताना उस्मान गनी म्हणाले होते की, “आम्ही तीन-चार जागा गमावत आहोत.”
पंतप्रधान मोदी यांनी बांसवाडा येथील सभेत मुस्लिम समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यावर उस्मान गनी म्हणाले होते की, “मला त्यांचे (मोदींचे) विधान आवडले नाही. हा एकट्या नरेंद्र मोदींचा पक्ष नाही, शेकडो मुस्लिम भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.”
या चॅनलशी बोलताना उस्मान गनी पुढे म्हणाले होते की, “मी त्यांना (नरेंद्र मोदी) ईमेलही लिहणार आहे की, त्यांनी अशी फालतू विधानं केली नाहीत तर बरं होईल.”

पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर उस्मान गनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, ‘उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हो तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है.’ म्हणजेच ‘तुमच्या तत्वांशी तडजोड होत असेल तर विरोध करणं गरजेचं आहे, तुम्ही जिवंत असाल तर ते दाखवून देणंही गरजेचं आहे.’
“ज्या विधानाच्या आधारे पक्षातील जबाबदार लोकांनी माझी बाजू न ऐकता, कसलीही नोटीस न देता मला 6 वर्षांसाठी बाहेर काढले, त्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही,” असं गनी यांनी लिहिलं होतं.