मोदींच्या मातोश्रींचा १०० वा वाढदिवस – पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आईला विशेष भेट

0
315

गांधीनगर, दि. १६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या १८ जून रोजी १०० रीमध्ये प्रवेश करत आहेत. वाढदिवसानिमित्त मोदी कुटुंबाने वडनगर (जि. मेहसाना) येथील `मातृछाया` या निवासस्थानी नवचंडी पूजा, होमहवन तसेच गांधीनगर येथील घरी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

शनिवारी १८ जून रोजी पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर असून ते वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी या दिवशी आईची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. गांधीनगर येथील घरी हिराबेन यांचा १००वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई या आपल्या धाकट्या मुलासोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. तिथेच त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तसंच, वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजनदेखील करण्यात आलं आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त हिराबेन मोदी यांना पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट मिळणार आहे. हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचं नाव दिलं जाणार आहे, अशी माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे.

हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त रायसन पेट्रोल पंपाजवळीच ८० मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असं नावं दिले जाईल. त्याचे नाव येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा उद्दश आहे, असं गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे

हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. त्यांचे पुत्र प्रल्हाद मोदी यांच्या म्हणण्यानुसार, ‘हिराबेन शताब्दीकडे वाटचाल करत असताना आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. यावेळी मंदिरात संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे.