नाशिक, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रीय युवा अभियानापासून चार हात दूर राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर नाशिकमध्ये पोहचले आहेत. त्यांचा अजित पवार गट नाशिकमधील भव्य कार्यक्रमाच्या आयोजनापासून दूर का या प्रश्नाचेही उत्तर पवार देतील, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नाशिकमध्ये पोहचले आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ एकदाही समोर आले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यातून राजकीय मायलेज घेतले जाईल, यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
वास्तविक नाशिकमध्ये अशा मोठ्या आयोजनात कायमच पुढाकार घेणारे मंत्री छगन भुजबळ मात्र यावेळी बॅकफुटवर असल्याचे दिसले. अजित पवार हे सुद्धा नाशिककडे फिरकले नाही. यामुळे महायुतीत बेबनाव असल्याच्या चर्चाही सुरू झाल्यात. मुख्यमंत्री शिंदे आणि महाजन यांनी मात्र ही बाब वेळोवेळी फेटाळून लावली. अजित पवार पंतप्रधानाचे स्वागत करण्यासाठी अजित पवार हजर राहणार असून, त्यानंतर ते तपोवन मैदानातील सभास्थळी पोहचतील. सभा संपल्यानंतर ते लागलीच मुंबईला रवाना होणार आहे. या दौऱ्या दरम्यान अजित पवार गट पंतप्रधानाच्या कार्यक्रमापासून चार हात लांब का राहिले या प्रश्नाचे उत्तर मिळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे