मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी

0
231

– तमिळनाडु भाजपाच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता

चेन्नई, दि. १६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त तामिळनाडु भाजपने खास अशी घोषणा केली आहे. मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही योजना असून यात ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन म्हणाले की, आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी दिली जाईल. दरम्यान, तमिळनाडु भाजपाच्या या घोषणेमुळे या राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

अंगठी वाटपाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चाबाबत मुरुगन यांना प्रश्न विचारला गेला. याला प्रत्युत्तर देताना सांगितलं की, प्रत्येक अंगठी जवळपास २ ग्रॅम सोन्याची असेल, ज्याची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत असू शकते. ही मोफत देण्यात येणारी वस्तू नाही. तर या माध्यमातून आम्ही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांचे स्वागत करत आहोत. रुग्णालयात १७ सप्टेंबरला १० ते १५ मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडुत मोदींच्या वाढदिवसानिमित्त आगळीवेगळी योजना आणली आहे. मंत्र्यांनी सांगितले की, ७२० किलो मासे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड केली आहे. याचा पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा उद्देश मासे उत्पादनाला प्रोत्साहन देणं आहे. आम्ही यासाठीच ही पावले उचलत आहे. मोदी यावेळी ७२ वर्षांचे होत आहेत आणि यामुळेच आम्ही ७२० आकडा निवडला आहे.

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी दिल्ली भाजपने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करणार असल्याचं सांगितलं. या कालावधीत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते विशेष मॅरेथॉनचे उद्घाटन करतील. यामध्ये शहराच्या झोपडपट्टीतील लोक सहभागी होणार आहेत.