मोदींचे 70 हजार कोटी जिंकले, संविधानाला हरवले

0
211

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – “मोदींचे 70 हजार कोटी जिंकले आणि संविधानाला हरवले”.पण स्वातंत्र्य, समता आणि न्याय हा विचार टिकवण्यासाठी, लढण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी सामान्य जनतेतून अनेक गांधी,आंबेडकर आणि भगतसिंग जन्माला येतील हे नक्की., असे मतराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुख्य प्रवक्ता माधव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रात व्यक्त केले आहे.

पाटील म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार असताना मोदींचा नियोजित महाराष्ट्र दौरा होता.त्याच दौऱ्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रात झालेल्या 70 हजार कोटीचा घोटाळ्याचे नाव घेत त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण खरं तर 15 लाखासारखे हे आश्वासन सुद्धा भाजपला खरे करायचे नव्हतेच. राष्ट्रवादीला खिंडार पडायचे किंवा महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार स्थापन करायचे हे एकच नियोजन त्या दिवसापासून सुरू झाले. चक्रे पटापट फिरू लागली. संविधानात स्वायत्त संस्था म्हणून मान असलेल्या ईडी,आयटी आणि सिबीआयचा ससेमीरा भाजपाने अनेक नेत्यांच्या पाठीमागे लावला. नेत्यांकडे दोनच पर्याय होते, एक तर या भाजपच्या अखत्यारीत यंत्रणांच्या चौकशांना सामोरे जायचे किंवा भाजपच्या अधिपत्याखाली काम करायचे. शरद पवार, अनिल देशमुख आणि रोहित पवार यांनी चौकशांना सामोरे जायचा पर्याय निवडला तर “अजित पवार आणि टीमने” भाजपचा फक्त एक किल्लेदार म्हणून राहण्याचा पर्याय स्वीकारला.

काल निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो सर्वांना अपेक्षितच होता. शिवसेनेचे झाले ते राष्ट्रवादीच्या बाबतीतही होणार हे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सामान्य जनतेने ही ओळखले होते. त्यामुळे शरद पवार हेच आमचे निवडणूक चिन्ह, शरद पवार हाच आमचा झेंडा आणि हाच आमचा पक्ष हे कार्यकर्त्यांनी मनोमन ठरवले होते आणि त्यानुसारच आता पुढील वाटचाल सुरू राहील. शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवरती आम्ही चाललो आहोत हे अजित पवार यांना अनेक सभांमधून वारंवार सांगावे लागत आहे. पण शाहू फुले आंबेडकर यांचा विचार म्हणजे न्याय स्वातंत्र्य आणि समता होय. सीबीआय,इडी आणि आयटी सारख्या स्वायत्त संस्था या भाजपच्या हातातल्या बाहुल्या झालेल्या आहेत. या स्वायत्त संस्थांचा वापर भाजप आपल्या तोडफोडीच्या आणि दबाव तंत्राच्या राजकारणासाठी करत आहेत. उद्या केजरीवाल आणि हेमंत सोरेन भाजपमध्ये आले तरी नवल वाटू नये अशी परिस्थिती या भारतामध्ये निर्माण झाली आहे.आधी याच भाजपला भ्रष्टाचाराविरुद्ध बैलगाडी भरून पुरावे आणावे लागत होते. पण आता इडी, सीबीआय आणि आयटी यंत्रनांचा वापर करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे नाटक करून सत्ता केंद्र हातात घेणे हा एकमेव अजेंडा राबवायचा आहे. 2024 मध्ये मोदीजी प्रणित NDA आघाडी परत बहुमताने निवडून आली तर 2029 मध्ये भारतात भाजपशिवाय एकही पक्ष नसेल. न्याय स्वातंत्र्य आणि समता रुजवणारे संविधानच या देशात नसेल. म्हणूनच कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाने एकच स्पष्ट होते.