नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) – मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले. पंतप्रधान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील आगमनापूर्वी, ७५ अमेरिकन खासदार आणि काँग्रेस प्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पत्र लिहून भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करा असे म्हटले. याशिवाय अमेरिकन खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
पत्रात अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट आणि सिव्हिल सोसायटीच्या अहवालांचा हवाला देत, खासदारांनी राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेदरम्यान, भारतातील ‘राजकीय स्पेस कमी होणे, धार्मिक असहिष्णुता वाढणे, नागरी समाज संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे, तसेच माध्यमांवर वाढत असलेले प्रतिबंब’ या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने आपल्या मानवी हक्कांच्या नोंदीवरील टीका सातत्याने फेटाळून लावली आहे. हे अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित केले असल्याचे भारत सरकारने वारंवार सांगितले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक, व्यावसायिक आणि संरक्षण संबंध असल्याचे खासदारांनी त्यांच्या पत्रात नमूद केले. त्यांनी लिहले की, भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत आणि मित्रांनी प्रामाणिकपणे तथा मोकळेपणाने कोणत्याही मुद्द्यावर बोलले पाहिजे.
“भारत आणि अमेरिका यांच्यात असलेले मैत्रीचे संबंध यामुळेच आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की, भारत आणि अमेरिका यांच्यातील समान हिताच्या अनेक मुद्द्यांसह थेट पंतप्रधान मोदींशी चिंतेच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करायला हवी”, असेही अमेरिकन खासदारांनी लिहलेल्या पत्रात नमूद आहे. दरम्यान, हे पत्र लिहणाऱ्या खासदारांचे नेतृत्व सीनेटर क्रीस वॅन होलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केले आहे. होलेन या भारताच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर सातत्याने टीका करत असतात. त्यांनी अलीकडेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच्या डिनरमध्ये सहभाग घेतला होता.