मोदींचा जमालगोटा, ७० हजार कोटींच्या घोटाळ्याने केली राष्ट्रवादीची शिकार – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
774

ईडी च्या सर्व फायली कामी आल्या, शिवसेना संपली, भाजपने बरोबर डाव साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा जो घनाघाती आरोप केला ती गोळी अचूक लागली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा खूप मोठा भूकंप झाला. ईडी चौकशीच्या भितीने वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि भाजपच्या मदतीने सरकार बनविले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी अजित पवार यांच्यासह ३० आमदार फुटले आणि भाजपला जाऊन मिळाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची पाचव्यांदा शपथ घेतली आणि नऊ आमदारही मंत्रीमंडळात सामिल झालेत. या घडामोडी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडू नये तेच आज घडले. ईडी च्या फेऱ्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते आता निर्धास्त झालेत. भाजपला महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्षांना संपवायचे होते. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चितपट केले. कारण ४० आमदारांसह १३ खासदार आणि बहुसंख्य पदाधिकारी फुटले आणि ठाकरे यांची शिवसेना रिकामी झाली. उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हे कितीही वल्गना करू देत, शिवसेना भवन रिकामे झाले आहे. आता ज्या राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या खांद्यावर मान ठेवून महाआघाडीचा सारिपाट मांडला होता, तोच भाजपने उधळून लावला. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाआघाडीने भाजप विरोधात एकास एक उमेदवार दिला तर भाजपचे पानीपत होणार होते. सर्वेक्षणातील अंदाज सांगत होते की आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका, जिल्हा परिषदेला त्याचा झटका बसण्याची शक्यता होती. तसे झाले तर भाजपचे राज्यातील राजकारणच संपणार होते. अखेर जे अस्त्र वापरून ठाकरे यांची शिवसेना संपवली तेच ईडी, सीबीआय चे ब्रम्हास्त्र भाजपने बाहेर काढल्याने आता राष्ट्रवादी फुटली आहे. शरद पवार यांचे सर्व कट्टर समर्थकच विरोधातील फडणवीस यांना मिळाल्याने सगळ मूसळ केरात गेले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादीचा खरा चेहराही समोर आला आहे.

एकनाथ शिंदे समर्थकांचा वापर झाला, महत्व संपले –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची आता डळमळीत झाली आहे. कारण त्यांचे समर्थक असलेले मंत्री, आमदारांचे यापुढचे भवितव्य काय, हा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या पाच भ्रष्ट मंत्र्यांना वगळण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे. शिंदे हे फडणवीस आणि भाजपसाठी डोईजड झाले होते, आता तुमच्या वाचून आमचे काही आडत नाही, असा सूचक इशारा मिळाला असून त्यांनाही चाप लागला. बाळासाहेबांची शिवसेना चालवतो असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शिंदे यांचे आता मांजर होईल. भाजपने घात केला असता तर शिंदे यांनी स्वतः डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली असती, असे मंत्री केसरकर म्हणाले होते. आता शिंदे काय कऱणार की, परत ठाकरे यांचे दरवाजा ठोठावणार ते पहायचे.
शिंदे यांच्या आमदारांमुळे भाजपचे सरकार हे तसे बहुमतात असतानाही राष्ट्रवादी काँग्रस आणि अजित पवार यांनी हे पाऊल का उचलले याबाबत आता विश्लेषण सुरू आहे. शिंदे गटाला अलगद बाजुला करायचे म्हणूनच हा खटाटोप आहे, अशी शक्यता आहे. ठाणे, कल्याणसह लोकसभेच्या १९ जागांवर शिंदे गटाने दावा केल्याने भाजप आणि शिंदे गटात सुंदोपसुंदी सुरू होती. मध्यंतरी शिंदे यांनी वर्तमानपत्रांत जाहीरात देऊन मीच लोकांच्या पसंतीचा पहिला मुख्यमंत्री असे म्हणत भाजपवर कुरघोडी कऱण्याचा प्रयत्नसुध्दा एकनाथ शिंदे यांच्या अगंलट आले आहे. शिंदे यांच्या दोन समरर्थकांना केंद्रात मंत्रीपद मिळणार होते आता त्या जागा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

ठाकरे, राऊत यांचा अक्षरशः पोपट –
उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हे राजकारणात अक्षरशः खुळे निघाले. ठाकरेंचे ४० आमदार फुटले असताना त्यांना माहित नव्हते. त्यांच्या पायाखालती सतरंजी ओढून घेतली तरी ते आपल्या मातोश्री या हस्तीदंती मनोऱ्यात बसूनच हवेत गोळ्या मारत राहिले. उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासह सहकाऱ्यांच्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची लक्तरे ईडी, सीबीआय ने बाहेर काढली. वर्तमानपत्रांतून त्यांचा बोभाटा झाला, पण संजय राऊत त्या नंतरही दुगान्या झाडत राहिले. अजित पवार यांच्यावर निशाना साधत राऊत बरेच काही बोलले पण पवार कोणत्या मातीचे आहेत, हे त्यांनाही कळले नाही. राऊत यांच्या मदतीने शरद पवार यांनीच शिवसेना संपविली असे जाहीरपणे आरोप झाले आता तेच खरे निघालेत. फडणवीस यांनी काट्याने काटा काढला. आता ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था घरका ना घाटका अशी झाली आहे. या घडामोडीत जशी शिवसेना संपली तशी आता राष्ट्रवादीचीही आत्महत्या ठरली आहे. २०१९ मध्ये भाजपला बिनशर्थ पाठिंबा देण्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते, ते १०१ टक्का सत्य होते. पवार यांनी जनतेला आणि शिवसेना व काँग्रेसलाही चक्क मुर्खात काढले, हे सुध्दा तितकेच खरे. महाआघाडीच्या मदतीने लोकसभा, विधानसभा आणि महापालिका जिंकण्याच्या घोषणा या साऱ्या वल्गनाच होत्या. आता भाजपला मैदान साफ झाले आहे.

७० हजार कोटींचा घोटाळा खरा म्हणायचा –
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरदा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांनी मला विरोधीपक्ष नेतेपद नको , असे का म्हटले होते त्याचेही उत्तर आज मिळाले. अजित पवार यांचा सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा मोठी भूमिका बजावून गेला. सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांच्या भगिनींवरचे ईडीचे छापेसुध्दा आता फाईल बंद होतील. ज्या हसन मुश्रिफ यांच्या घरादारावर ईडीचे छापे पडले आणि त्यांना थेट अटक होणार होती तो आता इतिहास झाला आहे. कदाचित देशद्रोहाच्या आरोपाखाली गेली दीड वर्षे आत असलेले नवाब मलिक यांचीही सुटका होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरचे १०० कोटींच्या वसुलीचे आरोपही आता निकालात निघतील. सगळे मिळून ७० हजार कोटी रुपयेंच्या घोटाळ्याचे खुद्द मोदींनी कलेल्या आरोपांचे काय होणार ते आता पहायचे