मोठ्या भाभीला ड्रग्स माफियाकडून महिन्याला 15 लाखाचा हप्ता, छोट्या भाभीचे काय….

0
816

नाशिक, दि. २० (पीसीबी) : नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावेळी संजय राऊत यांनी घणाघाती भाषण करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आज आम्ही मोर्चा काढलाय. उद्या वेळ आल्यास नाशिक बंद पुकारू, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

ड्रग्स विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निगालेल्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी सरकारवर आगपाखड केली. छोट्या भाभीची चौकशी सुरू आहे. मोठ्या भाभीचं काय? हा प्रश्न आहे. मोठ्या भाभीला किती हप्ता मिळत होता? 15 लाख रुपये महिन्याला ड्रग्स माफियाकडून दिले जात होते. या शहरातील आमदारांना काय हप्ता मिळत होता हे पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. पालकमंत्र्यांना काय मिळत होतं, नांदगावपासून मालेगावपर्यंतचा हिशोब गृहमंत्र्यांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

रामकुंडात बुडवा, नाही तर तुडवा
नाशिकच्या ड्रग्स रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे. नाशिक वाचवायचं आहे. पिढी उद्ध्वस्त होताना पाहायचं नाही. शहरात ड्रग्सचा कोट्यवधीचा व्यवहार आणि व्यापार सुरू आहे. या सर्वांना रामकुंडात बुडवा. नाही तर तुडवा. माझं आव्हान आहे, या अंगावर, शिंगावर घेऊ. काय करणार आहात? अटक करता का? करा. एकदा तुरुंगात गेलो. परत जाईल. मला सांगू नका. शिवसैनिकांना धमकी देऊ नका. नाशिक ड्रग्स मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आज रस्त्यावर उतरलो. उद्या नाशिक बंद करू, असा इशाराच राऊत यांनी दिला.

शिक्षण मंत्री राजीनामा द्या
हा महासागर आहे. या मोर्चाचं एकटोक शालिमार चौकात आहे. एक इथे आहे. काल शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढलं. विद्यार्थ्यांनी मोर्चात जायचं नाही, असं त्यांनी फर्मावलं. हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा आहे. याचा अर्थ शिक्षण खात्याला हप्ते मिळतात का? शिक्षण मंत्री राजीनामा द्या. गृहमंत्र्यांना इशारा आहे. नाशिकच्या ड्रग्सच्या प्रश्नावर बोला. इकडची तिकडची गोष्ट सांगू नका. ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत जाईल. हा साधा मोर्चा नाही. लोकांचा उद्रेक आहे, असं ते म्हणाले.

कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा
सरकारने कुत्ता गोळी खाल्लीय का? पालकमंत्री कुत्ता गोळी खावून बसलेत का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, असं राऊत म्हणाले. या मोर्चाचं हे विराट रूप पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यायला हवं होतं. तिथे कंत्राटी भरतीवर पत्रकार परिषद घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.