मोठी बातमी, सेवा विकास बँक घोटाळा प्रकऱणात वकिल सागर सुर्यवंशी यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

0
438

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – सेवा विकास सहकारी बँकेच्या ४३० कोटी रुपयेंच्या गैरव्यवहार प्रकऱणात ईडी ने यापूर्वी पुण्यातील शिक्षण संस्था चालकाला अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली, आता पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेल्या सागर मारुती सुर्यवंशी यांना अटक केल्याने खळबळ आहे. पीएमएलए विशेष न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. याच घोटाळ्यात शहातील मोठ मोठे नेते, बिल्डर, शिक्षण संस्था चालक, माजी नगरसेवकांसह रथी महारथी अडकल्याने आणखी कोणाकोणावर ईडी कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष आहे.

दरम्यान, या घोटाळ्यामुळे या बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला असून सर्व व्यवहार ठप्प आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महिन्यापूर्वी याच प्रकरणात मोठी कारवाई केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ४५० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी आणि पुण्यातील औंधमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आला होता.

काय आहे प्रकरण ?
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही. यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.


सहकारमंत्री अतुल सावे यांचे प्रताप –
दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी आता हाच ऑडिट रिपोर्ट रद्द केल्याचे पत्र दिल्याचे स्वतः मुलचंदानी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यासह काही पदाधिकारी मूलचंदानी यांच्या सतत संपर्कात असल्याने हे प्रकरण भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

27 जानेवारी रोजी मूलचंदानी यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने चार ते पाच ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी मूलचंदानी यांच्या घरावर छापा टाकला असता ते नऊ तास त्यांच्या बेडरूममध्ये लपून बसले होते. मूलचंदानी यांचे पिंपरी आणि औंध येथे राहणारे दोन नातेवाईक, त्यांचा पीए आणि पिंपरीत राहणारा एक कर्मचारी आणि काळेवाडी फाटा येथील आलिशान सोसायटीत राहणारे दोन जवळचे उद्योगपती आणि महापालिका कंत्राटदार बंधू यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले होते.
मुलचंदानी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनाही अटक केली होती. या कर्मचाऱ्यांनी मूलचंदानी यांना गोपनीय माहिती दिल्याचा त्यांच्यांवर आरोप आहे. तसेच त्यांनी गुप्त फाईल्स लीक केल्याचा त्यांच्यांवर आरोप आहे. या प्रकरणात सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या चालकालाही ईडीने अटक केली होती.