मुंबई,दि.२७(पीसीबी) – संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या.
संजय राऊत यांना उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याआधी संजय राऊत यांचा अलिबागमधील प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली आहे.
यापूर्वी, या प्रकरणात आतापर्यंत 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांची आहे, तर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या मालकीची आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत म्हणाले की, संपत्ती जप्त झाली किंवा गोळ्या झाडल्या तरी या प्रकरणाला मी घाबरत नाही. राऊत यांनी ईडीची ही कारवाई सूडाची कारवाई असल्याचं म्हटलं होतं.