मोठी बातमी…! विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सुपूर्द

0
399

पुणे,दि.२०(पीसीबी) – मेट्रो प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या मान्यतेनंतर हा प्रकल्प केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला लवकर मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातून पुणे मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहता निगडी पर्यंत मेट्रो गेली पाहिजे, अशी आग्रही मागणी आहे, पण तिकडे दुर्लक्ष होत आहे.

मेट्रोच्या चार मार्गिकांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग यांचा समावेश आहे. या मार्गिकांचा प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यातील वाहतूकीची कोंडी लक्षात घेता पुणेकरांसाठी राज्य शासनाकडून मेट्रोची तरतूद करण्यात आली आहे. काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या मेट्रो 2 च्या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो अगदी सुसाट धावायला लागली.

यामधील वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) या मार्गिकांसाठी 3,503 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग या मार्गिकांसाठी एकूण 7,257 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आधी राज्याकडून आणि त्यानंतर केंद्राकडून या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पासाठी रक्कम आणि जागा महामेट्रोला महापालिकेकडून देण्यात येणार आहे.

वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली या मार्गिकेसाठी 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर इतर मार्गिकांसाठी 6 कोटी 77 लाख रुपयांच्या जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीची बैठक देखील पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर महापालिकेच्या मुख्य सभेनेही या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिकांचे अंतर 12.75 किलोमीटर इतके आहे. इतर मार्गिकांचे एकूण अंतर हे 31.98 किलोमीटर इतके आहे. यामध्ये खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या मार्गिकेचं अंतर हे 25.86 किमी इतके आहे. पौड फाटा-वारजे-माणिकबाग 6.11 किलोमीटर अतंर आहे. या या मार्गिकांची एकूण लांबी ही 44.73 किलोमीटर आहे