मोठी बातमी ! वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र!’

0
160

पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. वसंत मोरे हे पुण्यातले मनसेचे धडाडीचे नेते आहेत. एखादी समस्या आली, कुठे काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला, समस्येला वाचा फोडतात हे बऱ्याचदा दिसलं आहे. लोकांमध्ये ते याचमुळे प्रसिद्ध आहेत.

इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंनी हा निर्णय का घेतला, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान वसंत मोरेंनी काल रात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली होती. “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’ असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं .

काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती.