अंतरवाली सराटी, दि. 27 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्राती विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई संगीता निलंगेकर यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसकडून निलंगा विधानसभेसाठी त्यांचे पती अशोकराव निलंगेकर इच्छुक होते. मात्र निलंग्याची जागा काँग्रेसकडून अभय साळुंके यांना सुटल्याने संगीता निलंगेकर नाराज आहेत. यामुळे संगीता निलंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षाही व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील आणि संगीता निलंगेकर यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव माने यांनी भाजपातून छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. माजी खासदार शिवाजीराव माने कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहेत. कळमनुरी मतदारसंघात गावागावात माझा कार्यकर्ता आहे. मनोज जरांगे पाटील यांच आदेश असेल तर मला विजयाची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिली.
हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. हिंगोली विधानसभेची जागा वाटाघाटीत ठाकरे शिवसेनेच्या रूपाली पाटील गोरेगावकर यांना सुटल्याने भाऊराव पाटील गोरेगावकर नाराज झाले आहेत. यामुळे भाऊराव पाटील यांनी हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मी आज बैठक घेतली आणि लोकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. याच बैठकीत ठरलं की अर्ज भरल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यायची. यानंतर मी भेट घ्यायला आलो. काँग्रेस जिल्ह्यात तीन विधानसभा आहेत. समान वाटा मिळाला पाहिजे होता मात्र तो मिळाला नाही, असे भाऊराव पाटील म्हणाले.