मोठी बातमी! राज ठाकरेंकडून तिसरी यादी जाहीर, ‘त्या’ नावाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

0
72

मुंबई, दि. 23 (पीसीबी) : मनसेकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिकमधील भाजप नेत्याचं नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हा नेता नाशिकमधील भाजपचा बडा नेता आहे. या नेत्याला नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यामुळे या नेत्याने भाजप पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. याउलट नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या दिनकर पाटील यांनी बंडाची भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तडकाफडकी आज मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. मनसेकडून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनकर पाटील यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. दिनकप पाटील काही माजी नगरसेवकांसह मनसेत दाखल झाले आहेत. त्यांच्या या पुढच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. या निवडणुकीत ते सीमा हिरे यांचा पराभव करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ” भाजप पक्षाने माझ्यावर वारंवार अन्याय केला. महापौर बनवण्याचे सांगितले, विधानसभेला देखील थांबायला लावले. लोकसभेलाही थांबायला लागले. पुन्हा एकदा विधानसभेला आता थांबायला लावले. आता निवडणूक लढवणार. कुठल्या पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढवणार हे कार्यकर्त्यांशी बोलून सांगणार”, अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी याआधी दिली होती. दिनकर पाटील यांनी त्यानंतर निर्धार मेळावा घेतला होता. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून दिनकर पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन मी थांबलो. पण आता विधानसभेला थांबणार नाही, असंही ते म्हणाले. यानंतर त्यांचा मनसेत प्रवेश झाला.

दिनकर पाटील यांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का दिला आहे. मनसेने याआधी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता 13 उमेदवारांची तिसरी यादी मनसेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अमरावतीतून पप्पू उर्फ मंगेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहमदपूर-चाकूर मतदारसंघातून नरसिंग भिकाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.