मोठी बातमी! मुख्यमंत्री कोणाचा? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित, नेमकं काय घडणार?

0
47

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीला एकमत मिळाले तर महाविकासआघाडीचा सुपडासाफ केला आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला

मुख्यमंत्रिपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल.

तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. आता या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्षे किंवा 2-2-1 अशा फॉर्म्युल्यामध्ये वाटणार नाही. सध्या महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी कोणता फॉर्म्युला निश्चित केला जातो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.