मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू पहाटे पहाटेच जरांगे यांच्या भेटीला, भेटीमागे दडलंय काय?

0
59

अंतरवाली सराटी, दि. 23 (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. . त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

तर दुसरीकडे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विविध पक्षातील राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. काल बीडचे खासदार आणि शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यात 6 विधानसभा आहेत. त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे. यानंतर बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया देताना ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे, असे म्हटले होते. मनोज जरांगे पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझी जरांगेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. बीड जिल्ह्यातील 6 जागा मागणे काही गैर नाही. पण तरी एखादी जागा महाविकास आघाडी किंवा मित्र पक्षाला जाईल. बीडमध्ये आमच्या सहा विधानसभा निवडून येतील, असा मला विश्वास आहे, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले.