मोठी बातमी! महाराष्ट्र आता थांबणार नाही…, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुणी-कुणी घेतली शपथ?

0
49

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यावेळी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा भव्य सोहळा आज पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं लिहिण्यात आलं होतं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला समोर आला. या निकालाने एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरवत नवा इतिहास रचला. महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळाला. महाराष्ट्रातील 288 पैकी 230 जागांवर महायुतीला यश आलं. पण इतकं यश मिळाल्यानंतरही महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेस प्रचंड विलंब झाला. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा रंगू लागली होती. महायुतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली होती.

दिल्लीतून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे महायुती सरकारच्या स्थापनेस विलंब झाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्यास तयार नसल्याची चर्चा सुरुवातीला सुरु होती. पण त्यानंतर शिंदे यांनी स्वत: माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडत असल्याचं जाहीर केलं. आपला भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांना गृहखातं हवं असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांना गृहखातं हवं असल्याने महायुतीच्या सत्ता स्थापनेत पेच निर्माण झाला होता. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रचंड प्रयत्न करण्यात आले. तरीही गृहखातं कुणाकडे जाणार? याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

या सर्व घडामोडींदरम्यान महायुतीचे तीनही प्रमुख नेते काल राजभवनावर गेले. या तीनही नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना उद्देशून मोठं वक्तव्य केलं. शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे यासाठी आपली विनंती असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. राजभवनातून निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली होती.

या घडामोडींनंतर आज मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेचे सर्व नेते आज शिंदेंच्या मनधरणीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, यासाठी आग्रह केला. अखेर सर्वांच्या आग्रहाखातर शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. यानंतर शिवसेनेचे नेते उदय सामंत हे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं पत्र घेऊन राजभवनावर दाखल झाले. त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? ते अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. इतर मंत्र्यांचा शपथविधी हा 11 डिसेंबरला पार पडेल, अशी चर्चा आहे.