मोठी बातमी! महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीचं; वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी जाहीर

0
60

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. तर दुसरीकडे सत्तास्थापनेपूर्वी महायुती सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. नुकतंच याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला बळकट करण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 20.00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून काल २८ नोव्हेंबर २०२४ रोजी एक शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान वितरित करण्याबाबत असा विषय नमूद करण्यात आला आहे. त्यासोबतच प्रस्तावनेमध्येही याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण २० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून शासन निर्णयान्वये २ कोटी इतके अनुदान महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास वितरित करण्यात आले आहे. आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी १० कोटी इतके अनुदान वितरित करण्याची मागणी सादर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आता नियोजन आणि वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी १० कोटी इतके अनुदान मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना अदा करण्यास मान्यता देत आहे.