मोठी बातमी! भोसरी आणि मावळ मतदारसंघात मतमोजणीच्या आकड्यांमध्ये तफावत?

0
88

भोसरी, दि. 25 (पीसीबी) : भोसरीच्या मतमोजणीत प्रत्यक्ष केंद्रावर झालेले मतदान आणि मोजणीमध्ये मतांची तफावत आढळली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३ लाख ६५ हजार ५५ मतदान झाले होते. मात्र, प्रत्यक्ष ३ लाख ७४ हजार ५४७ मतांची मोजणी केली आहे. तब्बल ९४९२ मते जास्त असल्याचे समोर आले आहे. मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी अंदाजित असून दुसऱ्या दिवशी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ३ लाख ७४ हजार ४४२ मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मतमोजणीची आकडेवारी बरोबर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तर, मावळ मतदारसंघात झालेले मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यांमध्ये तफावत आढळली आहे. दोन मतपेट्यांमधील मतमोजणी राखून ठेवल्याने मतदानामध्ये फरक दिसून येत आहे, अशी माहिती मावळ विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी रविवारी दिली.

भोसरी मतदारसंघाच्या निकालाची अंतिम आकडेवारी शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली. त्यात महेश लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४, तर अजित गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते मिळाली. बलराज कटके यांना १९०९, अमजद खान ३११७, जावेद शहा २३२, अरुण पवार १४७, खुबुद्दीन होबळे १११, गोविंद चुनचुने २९०४, हरिश डोळस १७३, रफिक कुरेशी ३०१ आणि शलाका कोंडावर यांना ३०१ मते मिळाली. ही एकूण आकडेवारी ३ लाख ७२ हजार ७१९ होत आहे. ‘नोटा’ म्हणजेच वरीलपैकी एकही योग्य उमेदवार नसल्याचे मत २६८५ मतदारांनी नोंदवले. ५४ मते अवैध ठरली. ही सगळी संख्या ३ लाख ७४ हजार ५७४ होते.

मावळ मतदारसंघात ३ लाख ८६ हजार १७२ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२०) मतदान पार पडले. यामध्ये १ लाख ४४ हजार २१४ पुरुष, १ लाख ३६ हजार १०२ महिला, इतर ३ अशा २ लाख ८० हजार ३१९ (७२.५९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी झालेल्या मतमोजणीत एकूण २९ फेऱ्यांमध्ये २ लाख ७९ हजार ८१ मतेच मोजण्यात आली. त्यामुळे झालेल्या मतदान आणि मोजणी केलेल्या मतांच्या आकड्यांमध्ये तफावत आढळली.