मोठी बातमी! भाजपला सर्वात मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याचा मुलगा तुतारी हातात घेणार

0
72

मुंबई, दि. 21 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक बेलापूरमधून निवडणूक लढण्यासाठी अच्छुक आहेत. त्यांच्याकडून भाजपच्या वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. पण एका कुटुंबातून एकालाच संधी या धोरणामुळे संदीप नाईक यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप नाईक हे शरद पवार गटात प्रवेश करुन भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अखेर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप नाईक यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा उद्या शरद पवार गटात अधिकृत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर संदीप नाईक हे शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक यांचं नवी मुंबई महापालिकेत चांगलं वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेत त्यांच्या विचारांचे अनेक नगरसेवक याआधी निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. संदीप नाईक यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर एकाच कुटुंबात दोन पक्षांचे दोन उमेदवार असं चित्र यामुळे निर्माण होणार आहे.

विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती. गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक हे दोन्ही नेते एकत्र भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा होती. गणेश नाईक यांच्याकडून पक्षाकडे आपल्या कुटुंबासाठी 2 जागा सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. पण भाजपमध्ये एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी असा नियम करण्यात आल्याने गणेश नाईक यांची मागणी मान्य झाली नाही. पक्षाने गणेश नाईक यांचा नवी मुंबईच्या राजकारणातला दबदबा पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली. पण भाजपकडून त्यांच्या मुलास उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे संदीप नाईक यांनी वेगळा निर्णय घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर आता त्यांचे चिरंजीव संदीप नाईक शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.