मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसचं होणार मुख्यमंत्री? RSS कडूनही ग्रीन सिग्नल

0
44

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. अशात महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली आहे. निकाल लागल्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा दर्शवली होती. त्यातच आरएसएसनेही फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाकडूनही याला पसंती मिळाल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं म्हटलं जातंय. असं झाल्यास एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुन्हा एकदा चालणार काय?, याबाबत चर्चा रंगत आहेत.

संघामधील कोणत्याही बड्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं नसलं तरी काही मीडिया रिपोर्टमध्ये संघाने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून ग्रीन साइन दिल्याचे महले आहे. भाजपच्या विजयामध्ये संघाचीही मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे संघाचे मत महत्वाचे ठरले जाऊ शकते. फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत. देवेंद्र फडणवीस अनेकदा संघाच्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे सहभागी होतात. विजयादशमीच्या संघाच्या उत्सवात ते संघाच्या पूर्ण गणवेशात सहभागी होतात. लोकसभेत संघाला दूर ठेवल्याने त्याचा फटका भाजपला बसला होता. मात्र, या विधानसभेत भाजपने ही चूक सुधारली.

विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटनांनी भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले. या काळात देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख पातळ्यांवर संघाच्या थेट संपर्कात होते. संघ स्वयंसेवकांनी राज्यातील काना-कोपर्‍यात बैठकांवर जोर दिला. नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्र हित, हिंदुत्व, सुशासन, विकास, लोक कल्याण आणि एकसंघ समाज या मुद्द्यावर त्यांनी अधिक जोर देत जनतेचा विश्वास प्राप्त केला. त्यामुळे भाजपला यशाचे शिखर गाठता आले, असं राजकारणात म्हटलं जातंय.

भाजपला विधानसभेत तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच व्हावा, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली जात आहे. आता याला आरएसएसनेही पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे