मोठी बातमी, ठाकरे कुटुंबाला न्यायालयाचे समन्स

0
206

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. यानंतर राज्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी सत्ता स्थापन केली. मात्र,उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून बंडखोरीसाठी शिंदे गटातील आमदारांना ५० कोटी घेतल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात येत आहे.

यानंतर सातत्यानं शिंदे गटातील आमदारांना डिवचण्यासाठी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणाही ठाकरे गटाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, आता याचप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे व संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालय समन्स बजावणार आहे. याप्रकरणी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या या तिन्ही नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ठाकरेंसह संजय राऊतांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर ‘गद्दार’ अशी टीका करण्यात येत होती, या शिवाय ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणाही ठाकरे गटाकडून शिंदे गटाविरोधात देण्यात येत होत्या. याच घोषणांविरोधात शिवसेना नेते राहुल शेवाळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात शेवाळे यांनी ठाकरे व राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांना समन्स बजावणार हे स्पष्ट झालं आहे. येत्या ३० दिवसांमध्ये सोशल मीडियावर ज्या पोस्ट शिंदे गटाच्या विरोधात करण्यात आल्या आहेत. त्यांना हटवण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.