मोठी बातमी! आयुष्य संपवण्याची भाषा करणारे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून बेपत्ता

0
51

पालघर, दि. 29 (पीसीबी) : विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने आमदारांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी बंड केलं हे आपण ऐकलंच आहे. मात्र, राज्यात तिकीट मिळालं नाही म्हणून आत्महत्या करण्याचा विचार एका आमदाराने केल्याचं क्वचितच ऐकलं असेल. शिंदे गटाच्या एका आमदाराने आयुष्य संपवण्याची भाषा केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आयुष्य संपवण्याची भाषा केली होती. अशात त्यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या 12 तासांपासून आमदार वनगा हे नॉट रीचेबल आहेत. तब्बल 12 तासांपासून श्रीनिवास वनगा घरात नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. वनगा यांचे दोन्ही फोन देखील बंद आहेत. त्यामुळे पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. . श्रीनिवास वनगा हे शिवसेनेत झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेले होते.

आता विधानसभा निवडणुकीत शिंदेंसोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. मात्र, श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यांना तिकीट न मिळाल्याने अश्रू अनावर झाले होते. काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका देखील केली होती.
यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेत संधी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र, कालपासून श्रीनिवास वनगा घरी नसल्यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नाही.

तर, उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी श्रीनिवास वनगा यांच्या घरी दाखल झाले होते. वसई जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी वनगा यांच्या घरी गेले होते. त्यांनी वनगा यांच्या पत्नीशी संवाद साधला. याशिवाय सुमन वनगा यांनी ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा देखील केली. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत, त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा हे माध्यमांसमोर ढसाढसा रडले होते. तर, ‘एकनाथ शिंदेंनी आम्हाला फसवलं आहे, उद्धव ठाकरेंसारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदेंसोबत गेले ही त्यांची घोडचूक आहे’, असं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या.