मोठी बातमी! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराला निवडणूक आयोगाची नोटीस; अडचणीत वाढ

0
55

मुंबई, दि. 19 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला तारखेला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत करताच राज्यात आचारसंहितेला देखील सुरुवात झाली आहे. आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.

त्यामुळे आता निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सदरील व्हिडिओ निवडणुक विभागाच्या वतीने तपासल्या जात असून याप्रकरणी लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांच्या वतीने मिळाली आहे. ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी आमदार बांगर यांच्यावर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.