मुंबई, दि. 26 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भेटीगाठी सुरु असतानाच एक भुवया उंचावणारी घडामोड घडली आहे. रिलायन्स इंड्रस्टीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि प्रख्यात उद्योगपती अनंत अंबानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मध्यरात्री झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनंत अंबानींनी नेमकी काय आणि कोणत्या विषयावर चर्चा केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अनंत अंबानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मध्यरात्री दीड ते दोन तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी दोघांमध्ये नेमक्या कुठल्या विषयांवर बोलणं झालं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या भेटीमागे व्यावसायिक कारण आहे, कुठल्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा सोहळ्याचं निमंत्रण आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सिलसिला पार पडला, हे स्पष्ट नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात घडलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
याआधी, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली बैठक जवळपास दोन तास चालली होती. या बैठकीला ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजसही उपस्थित होते. त्यानंतर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पिता-पुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. तिथेही तासभर त्यांच्या बैठका झाल्या होत्या.