मोठी बातमी। ना अजितदादांना ना शिंदेंना, दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच?

0
5

मुंबई, दि. 1३ (पीसीबी) : कोणाला मंत्री करता येईल यावर चर्चा झाली असून भाजपच्या यादीवर अंतिम निर्णय हायकमांड घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. २ दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत आहेत. रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसोबतही फडणवीसांनी भेट झाली. या भेटीत, भाजपकडून कोण कोण मंत्री असतील यावर चर्चा झाली पण अजूनही अंतिम यादी निश्चित झाली नसल्याचं कळतंय.

महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याचं स्वत: फडणवीसच म्हणाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला 20 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळू शकतात. गृहखात्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे आग्रही आहेत. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृहखात्यासह अर्थ खातंही भाजप स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. गृह जर शिवसेनेला मिळणार नसेल तर अर्थ खातंही भाजपनं स्वत:कडेच ठेवावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं कळतं आहे. त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरात महसूल तर नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकते. 14 तारखेला महायुतीचे 30-35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेवू शकतात, त्यात भाजपचे 15-16, शिवसेनेचे 8-9 आणि राष्ट्रवादीचेही 8-9 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला. पण अद्याप मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीच महाराष्ट्राचा गाढा चालवत आहेत. खात्यांवरुन रस्सीखेच असल्यानं विस्तार लांबतोय. त्यावरुन विरोधकांनीही निशाणा साधत आहेत. दिल्लीत फडणवीसही आले आणि अजित पवारही आले. पण एकनाथ शिंदे आले नाहीत. त्यावर शिंदेचा नियोजित दौरा नव्हता. आम्ही वैयक्तिक भेटीसाठी आल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. नागपुरात 16 तारखेपासून पहिल्याच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विस्तार होणार हे निश्चित. मात्र तिन्ही पक्षात दिग्गजांसह काही नवे चेहरेही असतील.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांवर त्यांचाच अंकुश असेल असं बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांनी जी खाती मित्रपक्षाला दिली त्या खात्याचे राज्यमंत्रीपद हे भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सर्व खात्यांवर बारीक नजर असेल अशीही चर्चा आहे.