मोठी बातमी। छगन भुजबळांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?

0
57

– समर्थकांचे अजितदादांच्या घराबाहेर आज आंदोलन

नागपूर, दि. 17 (पीसीबी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. तर आज अजित पवार यांच्या घरासमोर छगन भुजबळ समर्थक अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ हे काल नागपूरचे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य केले होते. छगन भुजबळ यांनी नाराजी बोलून दाखवल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. जालन्यात अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तर छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये समता परिषद आणि भुजबळ समर्थकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

यानंतर आता छगन भुजबळांच्या नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर आज सकाळी 11 वाजता ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. “साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत”, असा आशयाचे बॅनर भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म बाहेर झळकले आहेत. या बॅनरवर छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता समता परिषदेच्या दिलीप खैरेंचा फोटो आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. मात्र ती ऑफर छगन भुजबळांनी धुडकावून लावली आहे. तर राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती आमदारांमध्ये असल्याचे समजते. छगन भुजबळ आणि नाशिक आणि येवल्यात त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. आता छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की राष्ट्रवादीला बायबाय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.