मोठा धमाका, महाआघाडीचे १९ नगरसेवक भाजपमध्ये जाणार

0
211

पुणे, दि. ७ (पीसीबी) : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याची खात्री शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडीतील १८ ते १९ नगरसेवक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्यात असल्याचा दावा करत मुळीक यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसमध्ये माजी नगरसेवक रशीद शेख यांच्या प्रवेशानंतर माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काल पुण्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही बागवे पिता पुत्रांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.

त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या नेतृत्वात उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधातील आंदोलनात देखील बागवे पिता पुत्र गैरहजर होते त्यामुळे बागवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

रशीद शेख यांच्या प्रवेशानंतर अविनाश बागवे हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असताना फक्त अविनाश बागवे हेच नाही तर महाविकास आघाडीतील 18 ते 19 नगरसेवक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितलं आहे.