“मोटार व्हेईकल खटले नागरिकांनी लोकन्यायालयात घ्यावेत- दंडात सूट दिली जाईल!” – न्यायाधीश सोनल पाटील

0
322

पिंपरी, दि. : २० (पीसीबी) “मोटर व्हेईकल खटले नागरिकांनी लोकन्यायालयात घ्यावेत. तेथे दंडात सूट देण्यात येईल!” असे आवाहन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी केले. याप्रसंगी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पिंपरी – चिंचवड न्यायालय यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी, नेहरूनगर न्यायालय येथे ९ सप्टेबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता नियोजनाबाबत आयोजित कार्यकमात न्यायाधीश सोनल पाटील (सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), अप्पर तहसीलदार अपर्णा निकम, पिंपरी येथील न्यायाधीश श्री एम जी मोरे, क्षरीमती पी सी फटाले, श्री एन आर गजभिये, बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे आदि उपस्थित होते.

न्यायधिश एन आर गजभिये यांनी सर्वाचे स्वागत केले व जास्तीत जास्त खटले, दावे, अर्ज पक्षकार व वकिलांनी ठेवावे असे आवाहन केले. न्यायाधीश सोनल पाटील पुढे म्हणाल्या की, “खटले जास्त काळ प्रलंबित राहत असल्यास ते चालविण्यात संबंधितांना स्वारस्य आहे की नाही, याविषयी विचारणा करता येऊ शकते. एखाद्याला प्रत्यक्ष यायला जमत नसल्यास व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सहभागी होता येईल. एखादा मोबाईल, मोटरसायकल यासारख्या वस्तू हरवल्या असल्यास संबंधित आरोपीला शिक्षा होण्यापेक्षाही वस्तू मालकाला ती वस्तू पोलिसांच्या ताब्यातून परत मिळविण्यात जास्त स्वारस्य असते. कायद्याच्या ३७९ कलमांतर्गत असे खटले आपल्याला चालवता येतील किंवा निकाली काढता येतील. या संदर्भातील प्रलंबित खटल्यांची माहिती संकलित करता येईल. जे खटले चालविण्यात फिर्यादी/वादी यांना स्वारस्य नाही, ते कामकाजातून काढून टाकता येतील. त्यामुळे न्यायदानाचे काम अधिक गतिमान होईल. दंडाच्या रकमेत सूट मिळवता येईल, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायप्रक्रिया पोहोचू शकते!”

अॅड. सतिश गोरडे यांनी पिंपरी न्यायालयातील लोकन्यायालयाची परंपरा सांगून महाराष्टात पुणे जिल्ह्यात जास्त लोकन्यायालयात प्रथम क्रमांक व पुणे जिल्ह्यात पिंपरी – चिंचवड न्यायालयात जिल्ह्यात जास्त निकाली केसेस निघत आहेत अशी माहिती देऊन यावेळी जास्त खटले निकाली निघतील, मोटार व्हेईकल खटले व चेक रिटर्न खटले यावेळी घ्यावीत अशी मागणी केली. ॲड. अतीश लांडगे, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. कांता गोर्डे, ॲड अनिल पवार यांनी सूचना केल्या.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड प्रमिला गाडे, ॲड प्रशांत बुचुटे यांनी संयोजन केले. ॲड. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. मंगेश नढे यांनी आभार मानले