मोटार विहिरीत कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू

0
2

नाशिक, दि. ५ : खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली.

​दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात राजे बॅक्वेट हॉल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी खासगी क्लासतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिंडोरी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री दहा वाजता स्नेहसंमेलन संपल्यानंतर इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सदस्य एर्टिगा मोटारीने घरी परतण्यासाठी निघाले. त्यावेळी मंगल कार्यालय परिसरातील शेतातील एका विहिरीत त्यांची मोटार कोसळली.

या घटनेची माहिती समजल्यानंतर दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

​विहीर पाण्याने भरलेली असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. तीन क्रेनच्या साहाय्याने रात्री १२ वाजता ही मोटार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. या भीषण दुर्घटनेत सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेश्मा सुनील दरगोडे (३३), राखी सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे (१६), श्रेयस अनिल दरगोडे (११), माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

रात्रीच्या अंधारात चालकाला कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज आला नसावा, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात आला. राजू राजे यांच्या मालकीची ही विहीर असल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेत दिंडोरीतील इंदोरे येथील सुनील दरगोडे व अनिल दरगोडे या दोन भावांच्या कुटुंबातील मुले व सदस्यांचा मृतांमध्ये समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.