मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रीच्या वेळी श्वानपथक कार्यान्वित करण्याची मागणी

0
206

पिंपरी दि. ११ (पीसीबी) – संत तुकाराम नगर येथील मोहम्मद शेख या 6 वर्षाच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांवर मोकाट कुत्र्यांनी जीवघेण्या हल्ला केला. याला जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच  शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होण्यासाठी रात्रीच्या वेळी श्वानपथक कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की,   मोहननगर, चिंचवड स्टेशन आकुर्डी आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव होत असून, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण यावर योग्य त्या उपाययोजना राबव्यात. या गंभीर प्रकरणात आपण स्वतःहा तातडीने लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे. जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे  लागले. तर याची सर्वस्व जबाबदारी आपली असेल. प्रशासनाने याबाबत केवळ कागदी घोडे नाचवण्या पलीकडे काही केले नाही. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.      

 पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका  ठेकेदाराला दिला आहे. यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र या मोकाट कुत्र्यांची संख्या घटण्या ऐवजी ती वाढतानाच दिसते. संत तुकाराम नगर येथील मोहम्मद शेख वय 6 वर्षे या चिमुरड्या विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी भटक्या कुत्र्याने कडाडुन चावा घेतला. या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की या मुलाच्या हाताचे अक्षरशः लचके तोडले गेले. सुदैवाने काही नागरिकांनी या कुत्र्याला हुसकावून लावले म्हणून मोहम्मदचा जीव वाचला. मोहम्मदला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताला 13 टाके पडले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कठोर फौजदारी कारवाई करावी.