पिंपरी, दि. 6 (पीसीबी) : शहरातील कचराकुंड्या हटविल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पाहणी करून तेथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार असून, या ८० ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून देशभर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारचे एक पथक शहरातील झोपडपट्टी, मंडई, बाजारपेठ, लोकवस्ती, सार्वजनिक शौचालये, रस्ता आदी भागांची पाहणी करून दर वर्षी स्वच्छतेचे क्रमांक जाहीर करते. स्वच्छ सर्वेक्षणासाठी दर वर्षी केंद्राचे पथक फेब्रुवारी महिन्यात येते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वच्छतेसाठी आतापासून पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरात महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध माेकळ्या जागा, रस्त्याच्या कडेला नागरिक कचरा टाकत आहेत. कोणत्या भागात सर्वाधिक कचरा उघड्यावर टाकला जातो, याची आरोग्य विभागाने पाहणी केली आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या परिसरातील कारणे जाणून घेऊन घंटागाड्यांची संख्या वाढवून वेळही बदलण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दहा ठिकाणांची जबाबदारी दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसर स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतरही कोणी उघड्यावर कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
शहरातील विविध मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिक आणि महिलांची स्वच्छतागृहांअभावी मोठी अडचण होते. शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाते. मात्र, अनेक पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे बंद अथवा नादुरुस्त असतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व पेट्राेप पंपचालकांना नागरिकांसाठी स्वच्छतागृहे सुरू ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी पंपचालकांना पत्रही देण्यात येणार आहे. एक महिन्यानंतर सर्व पेट्रोप पंपांवरील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि वापरण्यायोग्य आहेत का, याची पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतागृहे सुरू न ठेवणाऱ्या पंपचालकांना नाेटीस बजावण्यात येणार आहेत. नागरिक मोकळ्या जागांवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कचरामुक्त पिंपरी-चिंचवड शहर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणांवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.