मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह दहा दिवसांनंतर सापडला

0
189

हत्या झाल्यानंतर तब्बल १० दिवस उलटल्यानंतर अखेर मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. २ जानेवारी रोजी दिव्या पहुजाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हत्या झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेतानाचं आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं होतं. त्याआधारे पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यांच्या तपासानंतर दिव्या पहुजाच्या मृतदेहाचा ठावठिकाणा पोलिसांना समजला होता. त्यानंतर शोधमोहीम हाती घेऊन पोलिसांनी दिव्या पहुजाचा मृतदेह शोधून काढला.

गेल्या काही दिवसांपासून गुरग्राममधील या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २ जानेवारी रोजी दिव्या पहुजाची गुरग्राममधल्या एका हॉटेलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. या हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन व्यक्ती दिव्या पहुजाचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केल्यावर या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.

२७ वर्षीय मॉडेल दिव्या पहुजा हिच्यावर एका गँगस्टरच्या हत्येचाही आरोप होता. हरयाणामधील संदीप गडोली नावाच्या गँगस्टरची मुंबईतल्या एका हॉटेलच्या खोलीत २०१६ साली हत्या करण्यात आली. या प्रकरणात दिव्या पहुजा हिचंही नाव होतं. या प्रकरणात दिव्या पहुजाला तुरुंगवासही झाला होता नुकतीच तिची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे या गँगस्टरच्याच परिचितांपैकी कुणीतरी दिव्याची हत्या केल्याचा किंवा तिच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, तपासाअंती तिच्या अभिजित सिंह या मित्रानंच तिची हत्या केल्याचं समोर आलं.

नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्या तिच्या अभिजीत सिंह या मित्रासह फिरायला गेली होती असं सांगितलं जात आहे. दोन दिवस तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अभिजित सिंह याच्याच मालकीच्या असणाऱ्या सीटी पॉइंट हॉटेलमध्ये तपास केला असता तिथे ते दोघे एकत्रच आल्याचं समजलं. अभिजित सिंहनं यासंदर्भात पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार, दिव्या सिंहकडे त्याचे काही अश्लील फोटो होते. हे फोटो त्यानं डिलीट करण्याची विनंती दिव्याला केली. पण तिनं नकार दिल्यानंतर रागात अभिजीतनं दिव्याची गोळ्या झाडून हत्या केली.