मेस्कोचे नको स्थानिक बेरोजगारांना पालिकेत संधी द्या – तुषार हिंगे

0
229

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मेस्कोचे कर्मचारी यांची भरती न करता पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक तरुणांना नोकऱ्या द्या, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जात आहे. तसेच,महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) मार्फत थेट पद्धतीने कर्मचारी भरले जात आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. त्यांची हक्काची असलेली नोकर भरती हिरावली जात आहे. मेस्को कडून नोकरी भरतीचा प्रकार तात्काळ बंद करून शहरातील स्थानिक युवकांना नोकरी द्यावी.

महापालिकेच्या विविध विभाग, इमारती, शाळा, गोदाम व कार्यालयाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तसेच, वाहनचालक कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत. तसेच अतिक्रमण धडक कारवाई पथकात एसएएफ चे जवान नेमले आहेत. या माध्यमातून महापालिका प्रशासनाने स्थानिक युवकांना डावलण्याचा प्रकार सुरू केला आहे.

मेस्कोकडून थेट पद्धतीने ही भरती केली जात आहे. सेवा निवृत्त सैनिकांची थेट पद्धतीने भरती केली जात आहे. त्यांची सेवा संपल्याने ते आपल्या कुटुंबाचा गुजराण चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांना निवृत्ती वेतनसह इतर सेवा व सुविधा मिळतात. असे असताना पुनः त्यांना थेट पद्धतीने नोकरीसाठी प्राधान्य देणे योग्य नाही. या प्रकारामुळे शहरातील स्थानिक सुशिक्षित व उच्च शिक्षित युवकांच्या नोकरीवर गदा येत आहे. नोकरी हिरावली गेल्याने बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे. अशी परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच मेस्कोकडून थेट कंत्राटी नोकरी भरती न करता, शहरातील स्थानिक युवक व युवतींना नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी मा.उपमहापौर तुषार हिंगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे करण्यात आली.