भोसरी, दि. ६ (पीसीबी) – कंपनीचा मेल आयडी हॅक करून त्यावर बनावट मेल करून कंपनीची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 24 ते 27 मे या कालावधीत अँफेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा ली या कंपनीत घडला.कमलेश दत्तात्रय क्षिरसागर (वय 33, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अँफेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा ली या कंपनीत अकाऊंट असोसिएट्स ऑफिसर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचा मेलआयडी अज्ञाताने हॅक केला. फिर्यादी यांच्या कंपनीकडून एका कंपनीला पैसे देणे होते. त्या कंपनीच्या बँक खात्याचे तपशील बदलले असल्याचा बनावट मेल फिर्यादी यांच्या कंपनीच्या मेलवर पाठवला. त्यामुळे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीला देणे असलेले एकूण रक्कम 97 लाख 17 हजार 294 रुपये आरोपीने पुरवलेल्या बँक खात्यावर पाठवले. यात फिर्यादी यांच्या कंपनीची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












































