मेट्रो स्‍टेशन कनेक्‍टीव्‍हिटीसाठी रिक्षा चालकांचा पुढाकार : बाबा कांबळे

0
3
  • मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत सकारात्‍मक चर्चा

*पिंपरी,दि. २८ – घरापासून मेट्रो स्‍टेशन पर्यंत येण्यासाठी नागरिकांना शेअर रिक्षाद्वारे रिक्षा चालकांकडून सेवा दिली जाईल. त्‍यासाठी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करणार आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्‍टेशनपर्यंत कनेक्‍टीव्‍हिटी सुलभ होण्यासाठी रिक्षा चालक पुढाकार घेतील, असा सकारात्‍मक प्रतिसाद महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेची बैठक पार पडली. पुण्यात पार पडलेल्‍या या बैठकीत मेट्रो स्‍टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना रिक्षा चालकांनी सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे, शहराध्यक्ष मोहंम्‍मद शेख, सचिव अविनाश वाडेकर आदी या वेळी उपस्‍थित होते.

या बैठकीत बोलताना मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्‍हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाकाठी लाखो प्रवाशांची नोंद पिंपरी ते स्‍वारगेट दरम्‍यान प्रवासाची होत आहे. नोकरदार वर्गासोबतच विद्यार्थी, महिला, वयस्‍कर नागरिकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. मात्र घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो. त्यांना इतर साधने उपलब्ध नाहीत. त्‍यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. स्‍वतःची वाहने आणल्‍याने मेट्रो स्‍थानकाजवळच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होईल, अशी भिती आहे. या प्रवाशांना रिक्षा चालकांनी पारदर्शक, सुलभ मीटर प्रमाणे व शेअर रिक्षा सेवा दिल्यास प्रवाशांची गैरसोय दुर होईल. तसेच रिक्षा चालकांनाही मोठा आर्थिक फायदा होऊन त्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील, असे श्रावण हर्डिकर म्‍हणाले.

या वेळी बाबा कांबळे म्‍हणाले की, रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करून शेअर रिक्षासाठी व मेट्रो स्टेशन पासून मीटरने रिक्षा व्यवसाय करण्यात येईल. तसेच मेट्रो स्‍टेशनपर्यंत नागरिकांना येण्यासाठी रिक्षा चालकही योग्य सेवा देतील यासाठी आम्ही लवकरच जनजागृती अभियान राबवून याबद्दल ठोस उपयोजना करणार आहोत. त्‍यासाठी रिक्षा चालकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.