मृतांचा आकडा मोठा, चेंगराचेंगरीसुध्दा झाली

0
203

नवी मुंबई, दि. १७ (पीसीबी) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकतं हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं. एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. काळा डाग लागला आहे. अजूनही किती लोकं मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर आलेला नाही, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा आकडा लपवू नका म्हणून सांगितलं होतं. पण या घटनेतील मृतांचा एक्झॅट आकडा अजूनही आलेला नाही. आता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, टाटा आणि डीवायएम रुग्णालयात पेशंट आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेतत, असं अजित पवार म्हणाले. तसेच या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यरात्री नवीमुंबईतील रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या घटनेत 20 लोक दगावल्याचं काही लोकांचं म्हणणं होतं. चॅनलवरही तसं चालू होतं. शेकड्यात लोकं गंभीर असल्याचंही कळत होतं. कालच्या कार्यक्रमाला बहुतेक पालघर, ठाणे, रायगड, काही पुणे आणि मुंबईतील लोक आले त्यामुळे गर्दी झाली होती. लोणावळ्यातील एका महिलेला मी विचारलं तुम्ही कशा आल्या? तर तिने आम्हाला न्यायला गाडी आली होती. ती कुणी पाठवली होती हे माहीत नाही, असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.

मृतांपैकी काही लोकांची ओळख पटली. चार लोकांची ओळख पटलेली नाही. उष्माघातामुळे किती जखमी आहेत? किती जण उपचार घेत आहेत? किती जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडलं? मृत्यू किती पडले? याचा आकडा कळायला मार्ग नाही. कार्यक्रमाची वेळ चुकली. संध्याकाळची वेळ असती तर योग्य झालं असतं. संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी असते. एप्रिल आणि मे मध्ये दुपारी कार्यक्रम घेऊच नये, असं अजित पवार म्हणाले.

काही रुग्णांशी बोललो. यातील बरेच लोकं 15 तारखेच्या रात्रीपासून आले. त्यांच्या अंघोळीची व्यवस्था नव्हती. शौचालयाची व्यवस्था होती. आमच्या पोटात काही नव्हतं, नुसतीच फळं खाल्ली. पाण्याची व्यवस्था होती, असं रुग्णांनी सांगितलं. ऊन प्रचंड होते. ऊन्हाची तीव्रता खूप होती. कार्यक्रम संपल्यावर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. उन्हाळा असताना दुपारी कार्यक्रम घेणे हेच आयोजकांचं चुकलं आहे, असं त्यांनी सांगितलं.