मुस्लीम महिलेला लागली श्रीरामांची ओढ! मुंबई ते अयोध्या शबनमचा 1400 किमी पायी प्रवास

0
172

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – सोमवारी अयोध्येत श्री रामललाच्या अभिषेकाच्या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक राम भक्त उत्सुक आहे. अयोध्येसह देशभरातील विविध शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होत आहे. रामावर श्रद्धा असलेले लाखो भाविक कोणत्याही मार्गाने अयोध्येला पोहोचत आहेत. हा ऐतिहासिक सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहावा अशी प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे.

दरम्यान, अशीच अशीच एक मुस्लिम रामभक्त 20 वर्षीय शबनम शेख असून ती मुंबईहून पायी प्रवास करत उत्तर प्रदेशातील बांदा येथे पोहोचली. चेहऱ्यावर हिजाब आणि मुखी जय श्री राम म्हणत शबनमने अयोध्येकडे कूच केली. खरं तर शबनम रविवारी बांदा येथे पोहोचली. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी ती अयोध्येत दाखल होईल.

शबनमचा 1400 किमी पायी प्रवास
बांदा ते अयोध्या जवळपास 250 किमी अंतर आहे. स्वत:ला सनातनी मुस्लीम म्हणवणारी 20 वर्षीय शबनम शेख हिने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून उत्तर प्रदेश गाठले. ती शनिवारी सायंकाळी बांदा शहरात पोहोचली. या शहरात पोहोचताच शबनमने येथील प्रसिद्ध संकट मोचन मंदिरात हनुमानजींचे दर्शन घेतले.

शबनम बांदा येथे आल्याचे समजताच अनेक हिंदू संघटनांनी मंदिरात पोहोचून तिचे जल्लोषात स्वागत केले. स्वत:ची ओळख करून देताना तिने सर्वांना जय श्री राम देखील म्हटले. त्यावर हिंदू संघटनांनी तिचे स्वागत केले. शबनमला हिंदू संघटनांकडून विविध भेटवस्तू दिल्या जात आहेत. शबनमची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Ram Mandir कार्यक्रमाचा उत्साह शिगेला
20 वर्षीय शबनमने सांगितले की, माझी लहानपणापासूनच प्रभू श्री रामावर श्रद्धा आहे. मी अजान तसेच भजने देखील ऐकली आहेत. मी अयोध्येत श्री रामललाच्या दर्शनासाठी 1400 किलोमीटर पायी प्रवास करण्याचा संकल्प केला होता. आज 31 व्या दिवशी बांदा येथे पोहोचली. राम सर्वांचा आहे, राम सर्वांमध्ये आहे हा संदेश मला सर्वांना द्यायचा आहे.

अयोध्येला पायी जात असताना शबनमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या पायाला दुखापत झाली असून फोड्या आल्या आहेत. मात्र, हे फोड अन् दु:ख तिच्या आस्थेसमोर फिके असल्याचे ती सांगते. रविवारी सायंकाळीच तिने अयोध्येकडे जाण्यासाठी प्रवास सुरू केला. वाटेत ठिकठिकाणी हिंदू संघटना तिचे स्वागत करत आहेत.