मुस्लिम जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानाला एक कोटी रुपयांची देणगी

0
325

तिरुमला, दि. २१ (पीसीबी) – धार्मिक वादाच्या भोवऱ्यात कधीतरी एखादी अशी घटना घडते ज्यामुळे खऱ्या अर्थाने एकोपा म्हणजे काय हे दिसून येतं. अशीच एक घटना यावेळेस चेन्नईमध्ये घडली आहे. चेन्नईतील सुबीना बानू व अब्दुल गनी या मुस्लिम जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. या देणगीमध्ये नव्याने बांधलेल्या पद्मावती विश्रामगृहासाठी ८७ लाख रुपयांचे फर्निचर आणि भांडी आणि एसव्ही अण्णा प्रसादम ट्रस्टसाठी 15 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे. या जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानमला अलीकडेच हे दान दिले. या जोडप्याचा सहकुटुंब एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अब्दुल गनी यांनी मंदिराला देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये, त्यांनी करोना महामारीच्या काळात मंदिराच्या आवारात जंतुनाशक फवारण्यासाठी बहु-आयामी ट्रॅक्टर-माउंट स्प्रेअर दान केले. यापूर्वी त्यांनी भाजीपाला वाहतूक करण्यासाठी ३५ लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर ट्रक मंदिराला दान केला होता.

तिरुमला तिरुपती देवस्थानमला भेट देताना सुबीना बानू व अब्दुल गनी यांचे संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशात दिसून आले. ANI ने शेअर केलेल्या या फोटोखाली कमेंट करताना अनेकांनी या कुटुंबाच्या परिधानाची देखील विशेष दखल घेत कौतुक केले आहे.

दरम्यान, सोमवारी सुमारे ६७,२७६ भाविकांनी तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची प्रार्थना केली. प्राप्त माहितीनुसार मंगळवार सकाळपर्यंत मंदिरात तब्बल १२ तास रांगेत प्रतीक्षा करून दर्शनासाठी भाविक थांबले होते. या एकाच दिवसात दानपात्रातून मंदिराला ५ कोटीहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. चेन्नईचे व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीतील प्रमुख देवस्थान आहे. अनेक भाविक स्वेच्छेने या मंदिरात मोठी देणगी देत असतात.