‘मुळा’ पुनरूज्जीवनासाठी 330 कोटींची निविदा .

0
286

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून वाहणार्‍या मुळा नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम दोन्ही महापालिकांच्यावतीने संयुक्तरित्या करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 624 कोटीच्या कामाची एकत्रित निविदा प्रक्रीयाही राबविण्यात आली. मात्र, पुणे महापालिकेचे क्रेडीट नोट आणि पिंपरी महापालिकेचे रोख मोबदल्याचे धोरण या वादात संयुक्त निविदा प्रक्रीया रद्द करण्याची नामुष्की दोन्ही महापालिकांवर ओढवली. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीतील वाकड बायपास ते सांगवी पुल या सुमारे 8.80 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पासाठी 330 कोटीच्या कामाची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे.

पिंपरी – चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी 44.40 किलोमीटर इतकी आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे 16 किलोमीटर इतकी आहे. या पूर्ण नदीचा अधिकांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने या पूर्ण नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, त्याची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तपणे करण्यास आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत वाहणार्‍या नदीच्या लांबीच्या प्रमाणात खर्च करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी मान्यता दिली आहे.

पिंपरी – चिंचवड हद्दीत येणार्‍या या नदीच्या सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी तब्बल 750 कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या खर्चास 16 फेब्रुवारी 2022 रोजी स्थायी समितीने आणि 6 एप्रिल 2022 रोजी महापालिका प्रशासकांनी मान्यता दिली आहे. एकत्रित निविदा प्रक्रीया राबविण्यात येत असल्याने पुणे महापालिका हद्दीतील भाग एकसाठी 304 कोटी आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील पहिल्या टप्प्यातील 8.80 किलोमीटर लांबीच्या भाग एकसाठी 321 कोटीच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात दोन्ही महापालिकांतर्फे 624 कोटी 76 लाख 66 हजार रूपये खर्चाची संयुक्त निविदा मागविण्यात आली. 8 नोव्हेंबरपर्यंत निविदा स्विकारण्याचे ठरविण्यात आले. मात्र, संयुक्त निविदा प्रकीयेत माशी शिंकली.

पुणे महापालिकेला ही कामे क्रेडीट नोटवर करायची आहेत. तर, पिंपरी – चिंचवड महापालिका हे काम रोख मोबदल्याने करणार आहे. त्यामुळे क्रेडीट नोट की रोख मोबदला या वादात संयुक्त निविदा प्रक्रीया रद्द करण्याची नामुष्की दोन्ही महापालिकांवर ओढवली. त्यानंतर दोन्ही महापालिकांनी दोन स्वतंत्र निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 390 कोटी 10 लाख रूपये इतकी आहे. या अंदाजपत्रकास शहर अभियंता कार्यालयाकडून 320 कोटी 85 लाख रूपये खर्चास 16 नोव्हेंबर 2022 रोजी तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. या कामासाठी सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात 1 कोटी 35 लाखाची तरतुद आहे. त्याअनुषंगाने पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सुमारे 320 कोटी 85 लाख 48 हजार रूपये तसेच रॉयल्टी आणि टेस्टींग चार्जेसपोटी 9 कोटी 89 लाख 52 हजार रूपये अशी एकूण 330 कोटी 75 लाखाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 5 जानेवारी 2023 पर्यंत निविदा स्विकारण्यात येणार आहेत. या कामाची मुदत पावसाळा कालावधी वगळून तीन वर्षाची आहे.