मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 624 कोटींचा खर्च

0
537

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – मुळा नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पिंपरी – चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तरित्या करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एकत्रित निविदा प्रक्रीया राबविण्यात येत असून पुणे महापालिका हद्दीतील भाग एकसाठी 304 कोटी आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील भाग एकसाठी 321 कोटी असे दोन्ही महापालिकांतर्फे 624 कोटी 76 लाख रूपये खर्चाच्या या कामासाठी संयुक्त निविदा मागविण्यात आली आहे. मुळा नदी दोन्ही महापालिकेच्या हद्दीतून वाहते.पिंपरी – चिंचवड शहरातून मुळा नदीचा 16 किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे.

पिंपरी- चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी 44.40 किलोमीटर इतकी आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे 16 किलोमीटर इतकी आहे. या पूर्ण नदीचा अधिकांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने या पूर्ण नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, त्याची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तपणे करण्यास आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत वाहणा-या नदीच्या लांबीच्या प्रमाणात खर्च करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी मान्यता दिली आहे. पिंपरी – चिंचवड हद्दीत येणा-या या नदीच्या सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी तब्बल 750 कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या खर्चास 16 फेब्रुवारी 2022 रोजी स्थायी समितीने आणि 6 एप्रिल 2022 रोजी महापालिका प्रशासकांनी मान्यता दिली आहे.

नैसर्गिक पद्धतीने विकसित करणार!
मुळा नदीच्या पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या बाजूचा विकास करताना जागेच्या उपलब्धतेनुसार, पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अनावश्यक बंधारेही काढण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाबाबत महापालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत वाकड बायपास ते सांगवी पुल या सुमारे 8.80 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याचे ठरविण्यात आले. या कामाची निविदा पुणे महापालिकेमार्फत एकत्रित राबविण्यात येत आहे. पुणे महापालिका हद्दीतील कामाचा भाग एकमध्ये आणि पिंपरी – चिंचवड हद्दीतील कामाचा भाग दोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकातील दर पुणे महापालिकेच्या दरसुचीनुसार, घेतल्यास पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या दरापेक्षा ही अंदाजपत्रकीय रक्कम कमी येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी दोन्ही बाजूचे अंदाजपत्रक पुणे महापालिकेच्या सध्याच्या दरसुचीनुसार घेण्यात आले आहे. भाग एकची मंजुरी पुणे महापालिका स्थायी समितीमार्फत आणि भाग दोनची मंजुरी पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समितीमार्फत घेण्यात आली आहे.

निविदा, वाद आढावा समितीची स्थापना!
या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकल्पाच्या निविदापूर्व आणि निविदापश्चात मान्यतेसाठी दोन्ही महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांची संयुक्त निविदा समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच वाद आढावा समितीची स्थापना केली आहे. एकत्रित निविदा प्रक्रीया राबविण्यात येत असल्याने दोन्ही महापालिकांसाठी असणारे अहमदाबाद येथील प्रकल्प सल्लागार एचसीपी कन्सल्टंट यांनी अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीतील भाग एकसाठी 304 कोटी आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील पहिल्या टप्प्याचे 8.80 किलोमीटर लांबीच्या भाग एकसाठी 321 कोटीच्या कामाचा समावेश आहे. त्यानुसार, दोन्ही महापालिकांतर्फे जीएसटी, रॉयल्टी, टेस्टींग चार्जेस वगळून 624 कोटी 76 लाख 66 हजार रूपये खर्चाची संयुक्त निविदा मागविण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत निविदा स्विकारण्यात येणार आहे. या कामाची मुदत पावसाळा कालावधी वगळून तीन वर्षाची राहणार आहे.