मुळा नदीत शेकडो माशांचा मृत्यू – गंभीर प्रदूषण व चुकीच्या प्राधान्यक्रमाचा परिणाम

0
3

आज दि . १४ (पीसीबी)- सकाळी मुळा नदीत शेकडो मृत मासे तरंगताना दिसले. नदीच्या पाण्यातील धोकादायक पातळीचे प्रदूषण त्यातून स्पष्टपणे दिसून येते. ही घटना स्थानिक रहिवाशांनी पाहताच त्यांनी जीवितनदी व पुणे रिव्हर रिव्हायवलच्या कार्यकर्त्यांना त्याबाबत कळविले. ह्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी नदीच्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधलेले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे (पीसीएमसी) वारंवार केलेल्या निवेदनांनंतरही, सांडपाणी व औद्योगिक कचरा थांबविण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खूपच खालावल्यामुळे हे मासे मोठ्या प्रमाणावर मृत्यू पडले असणार आहेत. पावसाळा असल्यामुळे आणि नदीत येणारे जिवंत झरे सुरू असल्यामुळे नदीत सध्या वाहते पाणी आहे. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू पडले. त्यातून प्रदूषणाची भीषण पातळी स्पष्ट होते.

नदीपात्रात मेलेले मासे तरंगत असताना नदीकिनाऱ्यावर मात्र नदीकाठ सुशोभीकरणाचे (RFD) काम जोरात सुरू असल्याचे दिसते. यामध्ये तटबंध व पदपथ बांधण्यासाठी नदीकिनारची समृद्ध परिसंस्था (riparian zone) उद्ध्वस्त केली जात आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे, की योग्य रीतीने नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम उगमापासून प्रदूषण बंद करणे, सांडपाणी योग्य प्रकारे शुद्ध करणे, आणि नदीकिनारच्या वनांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर सौंदर्याच्या नावाखाली नदीचे रूपांतर निर्जीव कालव्यात होईल.

आज झालेला माशांचा मृत्यू हा इशारा आहे आणि तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही. आम्ही पीसीएमसी व संबंधित सर्व यंत्रणांना विनंती करतो की, पर्यावरण नाश करणारे काम थांबवून, पाण्याच्या गुणवत्तेवर तातडीने लक्ष द्यावे आणि खरी नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घ्यावी.