मुळा नदीचे पुनरुज्जीवन! पिंपरी पालिका पुणे पालिकेला देणार 80 लाख रुपये

0
304

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम दोन्ही महापालिकांमार्फत संयुक्तरीत्या करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड हद्दीत येणाऱ्या या नदीच्या सुमारे 10.35 किलोमीटर लांबीच्या हद्दीतील मालमत्तांची मोजणी करण्यात आली आहे. यासाठी पुणे महापालिकेने सल्लागार शुल्कापोटी 49 लाख रुपये तसेच मोजणी शुल्कापोटी अभिलेख विभागास 30 लाख 59 हजार रुपये दिले आहेत. त्यानुसार एकूण 79 लाख 66 हजार रुपये पुणे महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी 44.40 किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे 14.20 किलोमीटर इतकी आहे. या पूर्ण नदीचा अधिकांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने या पूर्ण नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरीत्या करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, त्याची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तपणे करण्यास आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत वाहणाऱ्या नदीच्या लांबीच्या प्रमाणात खर्च करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी मान्यता दिली.

हा प्रकल्प विस्तृत स्वरूपाचा असल्याने यामध्ये पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, खडको कॅन्टोन्मेंट बोर्ड, काही संरक्षण विभागाच्या जागा यामध्ये येत आहेत. पुणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतील प्रकल्पाची 11 भागांमध्ये विभागणी केली आहे. त्यापैकी काही भागांसाठी निविदा मागविण्यात आली आहे. त्याचअनुषंगाने पिंपरी-चिंचवड हद्दीत येणा-या सुमारे 10.35 किलोमीटर लांबीसाठी प्रकल्प सल्लागाराने तयार केलेल्या सन 2021-22 च्या दराचे पूर्वगणकपत्रानुसार एकूण अंदाजपत्रकीय रक्कम अंदाजे 750 कोटी रुपये इतकी येत आहे. या प्रकल्पासाठी काही भागामध्ये जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यासाठी भूसंपादनाचा खर्च अंतर्भूत करण्यात आलेला नाही.

संपूर्ण नदीच्या लांबीचा प्रकल्प राबविण्यासाठी अंदाजे पाच वर्षे इतका कालावधी लागणार आहे. पाच वर्षात होणारी संभाव्य भाववाढ या सूत्रानुसार येणारी रक्कम व भूसंपादनासाठी आवश्यक असणा-या रकमेसह येणा-या प्रत्यक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता व या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये टप्प्याटप्प्याने तरतूद उपलब्ध करुन देण्यास 6 एप्रिल 2022 रोजी महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डाव्या तीरावरील नदीकाठ ‘इम्बकमेंट रुरल रिपेरियन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच या तीरावरील कामही उजव्या तीरावरील कामाबरोबर करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत प्रकल्प सल्लागार यांना सूचना देऊन पुणे महापालिकेसाठी अवगत करण्यात आले आहे.

प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या विविध विभागांमार्फत नदीची हद्द निश्चित करण्यासाठी नदीकाठच्या मालमत्तांची मोजणी करण्यात आली आहे. यासाठी पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोजणी शुल्काकरिता नगर भूमापन अधिकारी यांना 30 लाख 41 हजार रुपये आणि मुळशी भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना 18 हजार रुपये असे एकूण 30 लाख 59 हजार रुपये शुल्क दिले आहे. तसेच अहमदाबाद येथील सल्लागार एचसीपी डिझाईन अॅण्ड प्लॅनिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एकूण शुल्क 4 कोटी 21 लाख रुपये इतके येत आहे. या रकमेपैकी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणा-या मुळा नदीच्या 10.35 किलोमीटर लांबीच्या प्रमाणात सल्लागार शुल्क 49 लाख 7 हजार रुपये तसेच अभिलेख विभागास देण्यात आलेले मोजणी शुल्क 30 लाख 59 हजार रुपये असे एकूण 79 लाख 66 हजार रुपये इतके येत आहे.

आयुक्त पुणे यांनी 27 जून 2022 रोजीच्या पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोजणी शुल्काच्या हिश्श्यापोटी 79 लाख 66 हजार रुपये देण्यास मागणी केली आहे. त्यानुसार मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महापालिकेच्या सहकार्याने राबविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कामासाठी द्यावे लागणारे शुल्क पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महापालिकेसोबत संयुक्तरीत्या राबविणे या लेखाशिर्षाखाली देण्यात येणार आहे.