मुलींच्या सांगण्यावरून एकास बेदम मारहाण

0
624

तळेगाव दाभाडे, दि. ०३ (पीसीबी) – तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी जात असलेल्या एका व्यक्तीला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. दोन मुलींच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 1) दुपारी दोन वाजताच्या सुमारास डाळ आळी तळेगाव दाभाडे येथे घडली.

राजू विजय जाधव (वय 45, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईनाथ दादू काळे (वय 21, रा. मारुती मंदिर तळेगाव दाभाडे) आणि त्याचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे त्यांच्या घराजवळ असलेल्या तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी जात होते. ते सार्वजनिक शौचालयाजवळ आले असता पाच जणांनी मिळून त्यांना दगडाने डोक्यात, मांडीवर, पाठीवर, हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी त्यांच्या ओळखीच्या दोन मुलींच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.