मुलाला, बापाला आणि बापाच्या बापालाही अटक केलीय, कोणालाही पाठिशी घालणार नाही – अजित पवार

0
92

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत आहेत. आम्ही सारखेसारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय, असे अजिबात नाही. विरोधक याप्रकरणात काय आरोप करतायत, हा त्यांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, पुणे अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी, आम्ही चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली याप्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमं लावण्यात आली. चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी सुरु आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. एकूणच हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. रोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

मी पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो: अजित पवार
या प्रकरणात अजित पवार यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन दबाव आणला होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले की, मी सीपींना वर्षभर काही ना काही कारणासाठी फोन करत असतो. पुण्यातील अपघातानंतर मी त्यांना फोन करुन दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सांगणं माझं काम आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण याप्रकरणात काहीजण माझ्यावरच घसरले, असा टोला अजितदादांनी अंजली दमानिया यांना लगावला.