मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पराभव होणार म्हणे…, एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढले

0
306

कल्याण, दि. १ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या टेन्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर आधी भाजप दावा करणार असल्याच्या बातम्या होत्या, तर आता त्यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत श्रीकांत शिंदे यांचा पराभव झाला पाहीजे यासाठी शिवसेना ने मोर्चेबांधणी सुरु केल्याचं चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी गाठली, त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षावर दावा ठोकला आणि निवडणूक आयोग तसेच विधानसभेच्या सभापतींनी देखील त्यांचा दावा मान्य केला, त्यामुळे मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता अधिक आक्रमक झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरेंकडून हिसकावून घेतल्यानंतरची पहिली मोठी निवडणूक अर्थात लोकसभा निवडणुकीच्या रुपाने होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळचा उमेदवार त्यांचा मुलगा असणार आहे, त्यामुळे त्यांच्या मुलालाच पराभवाचं आस्मान दाखवून द्यायचं असा पण शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचा दिसत आहे. शिवसेनेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिला दौरा केला तो श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं यावेळी दाखवलेली ताकद श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढवणारी ठरली. यावेळी नेहमी घराणेशाहीवर बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी घेरलेलं दिसलं. आगामी निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देण्याचं आव्हान देखील त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या पराभवाची चर्चा जोर धरु लागली आहे.

उद्धव ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता डोंबिवलीत बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “मतदार राजा हे तुझं शेवटचं मतदान ठरु नये. तुझं एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी…” अशा आशयाचे बॅनर मतदारसंघात लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीमुळे वातावरणनिर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे यांना या मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद आणि त्यापाठोपाठ करण्यात आलेल्या बॅनरबाजीची आता एकच चर्चा सुरु आहे. भाजप लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी प्रयत्नशील असताना ठाकरे गटाकडून अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला टार्गेट केलं जात असल्याने भाजपसाठी सुद्धा हा प्रकार चिंतेचा आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघात सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या पराभवाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.