मुख्यमंत्र्यांच्या खेळीमुळे पिंपरीतील भाजप इच्छुकांच्या पोटात गोळा

0
561

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहर भेटीत वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला अवर्जून भट दिल्याने भाजपच्या गोटात भलतीच अस्वस्थता पसरली आहे. कारणही तसेच आहे. पिंपरी राखीव मतदारसंघात यापूर्वी भाजपने तीन वेळा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे आणि शिवसेनेच गौतम चाबुकस्वार असे आलटून पालटून विजयी झाले. परिणामी आता आगामी विधानसभेला या जागेवर शिवसेना शिंदे गटाने आपला हक्क दाखवला आहे. शहरातील तीन विधानसभांपैकी भाजपकडे भोसरी आणि चिंचवड असे दोन्ही मतदारसंघ गेली तीन टर्म कायम आहेत. पिंपरी हा एकमेव राखीव मतदारसंघ आहे. यापूर्वी जागावाटपात रिपाईच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासाठी भाजपने ही जागा सोडली होती. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. आता तिथे तयारीचा उमेदवार देण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यात जातीने लक्ष घातले आहे. फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांना या जागेसाठी तयारी कऱण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. त्यानुसार भाजपचे काही कार्यकर्ते कामालाही लागलेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी या जागेसाठी शिवसेनेकडे एक तगडा उमेदवार असल्याचे दाखविण्यासाठी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट देऊन भाजपलाच सूचक इशारा दिल्याने खळबळ आहे.

भाजपमध्ये गोरखे यांच्याशिवाय अनेक इच्छुकांची यादी तयार असून ते सगळेच गडबडलेत. कारण शिंदे यांनी राष्ट्रवादी आमदार बनसोडे यांच्याकडे जाऊन भाजपला चुचकारले आहे. यापूर्वी उमेदवारी केलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या खंद्या कार्यकर्त्या आणि जेष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांचे नाव आजही प्राधान्याने घेतले जाते. त्यांच्या खालोखाल भ्रष्टाचार विरोधात रान पेटविणाऱ्या रणरागीनी म्हणून सतत चर्चेत असलेल्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचे नाव वजनदार समजले जाते. तीन वेळा नगरसेविका असलेल्या सिमाताई सावळे यानी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र त्या प्रभावी उमेदवार असतील. माजी खासदार अमर साबळे यांचे स्वतःचे तसेच त्यांची कन्या वेणू साबळे यांचेही नाव इच्छुक उमेदवार म्हणून स्पर्धेत आहे. माजी नगरसवेक भीमा बोबडे हे आजवर वारंवार इच्छुकांच्या यादीत असतात. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पिंपरी राखीवसाठी खेळी केल्याने भाजपच्या या सर्व इच्छुकांचे धाबे दणानले आहेत. आमदार बनसोडे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घ्यायचा आणि त्यांनाच ताकद द्यायची, अशी ग्वाही स्वतः शिंदे यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे झाले तर आपले काय या चिंतेत भाजपचे सर्व इच्छुक आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या रुपाने शिंदे गटाचे अस्तित्व आहे. आता एक आमदार जोडिला असला तर महापालिका निवडणुकिला अधिक सोपे होईल असा शिंदे यांचा कयास आहे. पिंपरी राखीव मतदारसंघात नवबौध्द आणि मुस्लिम मतदारांची संख्या तशी निर्णायकी आहे. चंद्रकांता सोनकांबळे, सिमा सावळे, अमर साबळे, वेणू साबळे हे सर्व नवबौध्द समाजातून असल्याने ते रेसमध्ये पुढे आहेत. भाजप ज्यांच्यासाठी तयारीला लागली आहे ते अमित गोरखे हे मातंग समाजाचे आहेत. जातीच्या समिकरणात गोरखे यांना नवबौंध्दांची मते मिळण्याची शक्यता कमी आहे. आमदार बनसोडे हे स्वतः नवबौध्द असल्याने गोरखे यांच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकतात.

पिंपरी राखीव मतदारसंघात झोपडपट्टी मोठी आहे. तब्बल ४० टक्के परिसरात झोपडपट्टी आणि चाळी आहेत. मुस्लिम मतदारसुध्दा याच पट्ट्यात मोठ्या संख्येने आहे. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरीगाव, खराळवाडी, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी गावठाण, मोरवाडी या भागात चाळींचे प्रस्थ आजही कायम आहे. त्याशिवाय सर्वात मोठी झोपडपट्टी दापोडीत आहे. हिराबाईनगर, फुलेनगर, लांडेवाडी, गांधीनगर, भाटनगर, मिलिंदनगर, आंबेडकरनगर, रमाबाईनगर, आनंदनगर, साईबाब, लालटोपीनगर, इंदिरानगर, विद्यानगर, उद्योगनगर, रामनगर, दत्तनगर, अण्णासाहेब मगर नगर अशा सुमारे २३ वर लहान मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे तिथे भाजपचा कार्यकर्ता शोधूनही सापडत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. मतदानासाठी सर्व मदार रिपाई आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांवर असल्याने भाजपची स्वतःची डाळ इथे कधी शिजली नाही. मुस्लिम मतदार एकवेळ शिवसेनेला मते देतील, पण भाजपला मतदान करत नाहीत. फक्त भाजप बहुल परिसर म्हणून प्राधिकरण, आकर्डी, निगडी, शाहुनगर, संभाजीनगर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचा उल्लेख होतो. अशा स्थितीत भाजपला तिसरी जागा मिळवणे कठिण आहे आणि आता त्यात खोडा घालायचे काम खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केल्याने खेळ रंगणार आहे.

आगामी सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढू, असे खुद्द मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारवाने सांगितले आहे. आगामी काळात ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई आदी लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरून भाजप आणि शिंदे गटात तीव्र मतभेद आहेत. ठाणे शहरावर भाजपने हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. हा वाद गेली आठवडाभर धुमसत होता. त्यानंतर राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याच्या सर्व वर्तामानपत्रांच्या जाहिरातीतून दर्शविल्याने वाद विकोपाला गेला. भाजप आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा हा शिंदे यांचा प्रयत्न होता. शिवसेनाप्रमुखांचा फोटो नसल्याने ठाकरे गटाने शिंदे यांच्यावर प्रहार केला, तर फडणवीस हे शिंदे यांच्यापेक्षा कमी लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगत असल्याचा हवाला याच जाहिरातीत दिल्याने सर्व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी संतापले होते. अशात हे सरकार कोसळते की काय अशी शक्यता निर्माण झाल्याने महाआघाडीला गुदगुल्या झाल्या. वेळकाळ ओळखून फडणवीस यांनी दोन पावले माघार घेत समेट घडविला आणि शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड असल्याचे सांगत वळ मारून नेली. प्रत्यक्षात ही धुसफूस प्रत्येक शहरात सुरूच आहे. आता पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी राखीव मतदारसंघाबाबत तो वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे. आमदार बनसोडे खरोखर शिंदे गटात प्रवेशते झाले तर काय करायचे या चिंतेत भाजपमध्ये मंथन सुरू आहे.